अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक विविधता

सामाजिक/विविध

अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. नगर तालुक्यात शेंडी व पोखर्डी या गावांच्या सीमारेषेवर एक ओढा असून, त्या ओढ्याच्या पात्रात पोळ्याच्या दुसर्याक दिवशी गौराईची लढाई खेळण्याची प्रथा आहे. या लढाईत दोन्ही गावांतील सुवासिनी मोठ्या हिरिरीने सहभागी होतात. नगरमधील जिल्हा वाचनालय (ग‘ंथालय) १८२७ मध्ये स्थापन करण्यात आले. हे देशातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असून, आजही वाचकांसाठी कार्यरत आहे
शैक्षणिक - अहमदनगर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात येतो. जिल्ह्यात विविध प्रकारची सुमारे ६० महाविद्यालये आहेत. मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, हिंद सेवा मंडळ (स्वातंत्र्यसैनिकांची संस्था), भास्कर पां. हिवाळे शिक्षण संस्था (बी.पी.एच.ई.) आदी शिक्षण संस्था जिल्ह्यात व नगर शहरात कार्यरत आहेत. येथे रयत शिक्षण संस्थेचे मुलींचे महाविद्यालयही आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथे सहकारी चळवळीच्या माध्यमातून विकसित झालेले शैक्षणिक केंद्र पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील शिक्षण संस्थेत व्यवस्थापन, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी सर्व प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी पूर्ण देशातून विद्यार्थी येतात.

समाजसेवकांचा अहमदनगर जिल्हा - अलीकडच्या काळात नगर जिल्हा प्रभावी समाजसेवकांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे इथलेच असून, त्यांनी पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी ह्या गावाचा अक्षरश: कायापालट केला आहे. आदर्श गाव ही संकल्पना त्यांनी शिस्तबद्धपणे राबवली व भारतात एका विकसित, संपन्न खेड्याचे आदर्श उदाहरण घालून दिले. पाणलोट क्षेत्रांचा विकास, सामाजिक वनीकरण, सेंद्रीय शेतीचा प्रयत्न, गांडूळ खत प्रकल्प, शिक्षण विकास, व्यसनमुक्ती, सामाजिक सलोखा, गावातील लोकशाही, कुटुंबकल्याण या सर्वच क्षेत्रांमध्ये राळेगणची प्रगती झाल्याचे दिसून येते. अण्णा हजारे यांनी नापासांची शाळाही येथे काढली असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील मुलेही या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. भ्रष्टाचार निर्मूलन व माहितीचा अधिकार या क्षेत्रांत अण्णा हजारे यांनी मोठे कार्य केले असून शासनावर अंकुश निर्माण केला आहे.

नगर तालुक्यातील हिवरे बाजार या गावानेही राळेगण सिद्धीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती साधली आहे. पाणलोट क्षेत्र विकास, पाण्याची बचत व संयमित वापर ही येथील विकासाची प्रमुख सूत्रे आहेत. गेली अनेक वर्षे येथे ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक होत नाही. लोक एकत्र येऊन, एकमताने सरपंचाची निवड करतात. विंधन विहीर (बोअर वेल) न खोदणे, मुलींची लग्ने ठरवताना संबंधित मुलांची एच. आय.व्ही. टेस्ट घेणे असे क्रांतिकारक निर्णय गावाने घेतलेले आहेत. हिवरे बाजारचे शिल्पकार म्हणून पोपटराव पवार यांचा उल्लेख केला जातो.
नगर येथे शरीरविक्रय करणार्या स्त्रियांचे आरोग्य, त्यांचे पुनर्वसन, त्यांना कायदेशीर सहकार्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण व पुनर्वसन, एच.आय.व्ही. बाधितांचे आरोग्य, झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण, अनैतिक मानवी वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये स्नेहालय नावाची संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. वेश्यांच्या सुमारे २०० मुला-मुलींचे पुनर्वसन केंद्र स्नेहालयने उभारले असून, आत्तापर्यंत अनेक मुलींचे विवाह या संस्थेने लावून दिले आहेत. १९७० पासून जामखेड तालुक्यात डॉ. रजनीकांत व मेबल आरोळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यांना मॅगसेसे पुरस्कारही मिळाला आहे. राळेगण, हिवरेबाजार, स्नेहालय आदी ठिकाणे ही आधुनिक काळातील पर्यटन स्थळेच आहेत.
लष्कर - अहमदनगर हे लष्करीदृष्ट्या भारतातील महत्त्वाचे ठाणे आहे. नगरजवळ भिंगार येथे कॅन्टॉन्मेंट बोर्ड (लष्करी छावणी) आहे. ब्रिगेडीअर पातळीवरील अधिकारी बोर्डाचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो. येथे लष्करातील पुढील संस्था आपले कर्तव्य बजावीत आहेत.
आर्मर्ड कोअर सेंटर अँण्ड स्कूल : लष्कराची नगरमधील ही सर्वात जुनी (१९४८) संस्था आहे. येथे रणगाडाविषयक प्रशिक्षण दिले जाते. जनरल अरुणकुमार वैद्य व जनरल के. सुंदरजी हे काही काळ या संस्थेचे प्रमुख होते. परमवीरचक‘ मिळविणारे कर्नल तारापोर व कर्नल खेत्रपाल यांनी याच संस्थेत प्रशिक्षण घेतले होते. या संस्थेने उभारलेले रणगाडा संग्रहालय केवळ नगरचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. आशिया खंडातील हे अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय असून येथे इंग्लंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रांन्स इ. देशांनी विविध युद्धांत वापरलेले सुमारे ४० रणगाडे ठेवण्यात आले आहेत. सर्वात जुना १९१७ चा रोल्स राईस रणगाडाही येथे पाहण्यास मिळतो.

मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर (एम. आय. आर. सी.) : ही पायदळातील जवानांना व अधिकार्यांगना प्रशिक्षण देणारी संस्था १९७९ मध्ये नगर-सोलापूर रस्त्यावर सुरू करण्यात आली. जनरल के. सुंदरजी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची उभारणी झाली आहे. गेल्या काही वर्षात या संस्थेने मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेतली असून एम.आर. आय. सी. ग्रीन ची निर्मिती केली आहे. व्हेईकल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्ही. आर. डी. इ) : येथे लष्कराच्या वाहनांविषयी संशोधन केले जाते. वाहनांचा दर्जा, क्षमता व सुरक्षिततेच्या विविध चाचण्या येथे केल्या जातात. पृथ्वी क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहन याच संस्थेत तयार करण्यात आले . पंजाब पोलिसांसाठी अतिरेक्यांविरुद्ध लढण्याकरिता तयार करण्यात आलेली बुलेटप्रुफ वाहने याच संस्थेत निर्माण करण्यात आली होती. या संस्थेच्या आवारातच राष्ट्रीय चाचणी केंद्र असून देशातील विविध प्रकारच्या वाहनांची चाचणी येथील मार्गांवर (ट्रॅक्सवर) घेतली जाते.





  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved