अहमदनगर जिल्ह्यातील विशेष व्यक्ती

विशेष व्यक्ती

थोर स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन व अच्युतराव पटवर्धन यांनी स्वातंत्र्यसंग्रामात नगरचे नेतृत्व केले. यांनीच नगरमध्ये विविध प्रकारच्या संस्था स्थापन करून जिल्ह्यात संस्थात्मक पाया मजबूत केला. रावसाहेब पटवर्धन यांनी अहमदनगर वाचनालय, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी या संस्थांची स्थापना केली. ते साधना साप्ताहिकाचे काही काळ संपादक होते. तसेच त्यांनी आंतरभारती संस्था व सर्वोदय संघाचे अध्यक्षपद भूषवून त्या माध्यमातूनही संपूर्ण महाराष्ट्रात कार्य केले. बाळासाहेब भारदे रावसाहेबांचे अनुयायी होते. रावसाहेब व अच्युतराव यांनी जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते व नेते घडवले, त्यातूनच पुढे जिल्ह्याचा विकास साधला गेला.

स्वातंत्र्य संग्रामात विविध आंदोलनांत, विधायक कार्यांत कम्युनिस्ट नेते भाई सथ्था व सेनापती दादा चौधरी यांचाही प्रमुख सहभाग होता. सेनापती (पांडुरंग महादेव) बापट यांचा जन्म नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात झाला, तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते व श्रेष्ठ संसदपटू कै. मधू दंडवते हेही मूळचे नगरचेच. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रजनीकांत व मेबल आरोळे व पोपटराव पवार हे आपल्या कार्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधत आहेत.

एकेकाळी आपल्या कवितांनी महाराष्ट्राला वेड लावणारे कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक व त्यांच्या पत्नी ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांचे वास्तव्य नगरमध्येच होते. रेव्हरंड टिळक यांचेकडे बालकवी ठोंबरे यांचेही वास्तव्य काही काळ होते.. कवी दत्त, वि.द. घाटे, रवीकिरण मंडळातील मनोरमा रानडे अशा अनेक कवींनी नगरचा लौकिक वाढवला. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे, बंगाली साहित्याचा सरस अनुवाद करणारे विलास गीते, उर्दू साहित्याचे अभ्यासक प्रा. खलील मुजफ्फर, मराठी- सिंधी शब्दकोशाचे निर्माते प्रा. लछमन हर्दवाणी, विज्ञानकथा लेखक डॉ. अरुण मांडे हे सर्व साहित्यिक साहित्यसेवा करत नगरला व महाराष्ट्राला मोठे करत आहेत. संत ज्ञानेश्र्वर व श्रीकृष्णाची भूमिका अजरामर करणारे शाहू मोडक या चित्रपट अभिनेत्यांचे,व राम नगरकर, प्रा. मधुकर तोरडमल या नाट्य कलावंतांचे वास्तव्य काही काळ नगरमध्ये होते, तसेच ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत त्यांच्या लहानपणी नगरमध्ये राहिल्या होत्या. ‘यातनाम अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे मूळचे नगरचेच.

र. बा. केळकर, द.गो. कांबळे असे चित्रकार नगरमध्ये होऊन गेले. अंबादास मुदिगंटी, प्रकाश -प्रमोद कांबळे बंधू, अनुराधा ठाकूर इत्यादी चित्रकार-शिल्पकार आपल्या कलेच्या माध्यमातून नगरमध्ये कार्यरत आहेत. प्रमोद कांबळे या शिल्पकाराने बनवलेले वन्यप्राणी पाहण्यासाठी तसेच त्यांची कार्यशाळा व स्टुडिओ पाहण्यासाठी पूर्ण भारतातून लोक येतात.




  • मागे जाण्यासाठी येथे क्लिक करा
  •  
    Copyright © 2012. All Rights Reserved